पुल देशपांडे ? Pu La Deshpande

Description
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago

5 months ago
**गोविंदरावांनी ह्या वाद्याला असं मोठेपण दिलं, …

गोविंदरावांनी ह्या वाद्याला असं मोठेपण दिलं, जसं मोठेपण बिस्मिल्ला खाँसाहेबांनी सनईला दिलं. नाहीतर सनई देवळातल्या कुठल्या कोपऱ्यात वाजते ते माहितीही नसायचं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी

5 months ago

पु.ल
"परवाच मी एका लहान मुलाला विचारलं की तू कितवीत आहेस म्हणून तर तो, केजी-केजी असं काहीतरी म्हणाला.
म्हणजे हल्ली मुलं शाळेत वजनावर घेतात हे मला ठाऊक नव्हतं.
आमच्या वेळेस जर तसं असतं तर मी माझ्या तेव्हाच्या वजनानुसार एकदम सातवीत जाउन बसलो असतो."
(बिगरी ते मॅट्रीक)

5 months, 1 week ago
गोविंदराव टेंबेंनी हे वाद्य प्रतिष्ठेला नेऊन …

गोविंदराव टेंबेंनी हे वाद्य प्रतिष्ठेला नेऊन पोहोचवलं. ह्या वाद्यामध्ये ख्याल वाजवता येतो, नव्हे ख्याल गायल्यासारखा वाटतो, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यापूर्वी 'बाजूला टाकलेलं एक साथीचं वाद्य' अशा रितीनेच पेटीकडे पाहिलं जायचं. - सुरांची सृष्टी निर्माण करणारा 'आमचा गोविंदा' (१९८५) (पाचामुखी (२०१२)) #पुल #पाचामुखी

5 months, 2 weeks ago

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होत, पण भेटी झाल्या म्हणून मनाच्या गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात. अगदी आपलीशी होतात. हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडी निवडी काही काही आडव येत नाही, सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. आयुष्यात काही मनसुबे असे पटकन जुळतात आणि आनंद देतात. ही नाती खासगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढया लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटत अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे पन्नास असतात हो आयुष्यात, पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमी सापडतात बहुधा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे.

'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.

अशी सोपी सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपही नाही.चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते,मित्रांना नाही.

गीतकार पु .ल.

वायदा केला विसरू नका
संसाराच्या सारीपाटाचा
सांगते ऐका,पैशाला दोन बायका

संगीतकार पु.ल
पुलंनी खूप गाण्यांना अतिशय सुंदर संगीत दिलं आहे.त्या मुळे ही गाणी श्रवणीय झाली आहेत.त्यांनी संगीत दिलेली काही गाणी

इंद्रायणी काठी देवाची आळंदी
कबीराचे विणतो शेले
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग
माझे जीवन गाणे
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
शब्दावाचून कळले सारे
हसले मनी चांदणे
ही कुणी छेडिली तार

गायक पु.ल
पुलंनी काही गाणी देखील गायली आहेत

जा जा ग सखी जाऊन
पाखरा जा त्यजूनिया प्रेमळ शीतल छाया
बाई या पावसानं
ललना कुसुम कोमला

पु.ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता.

पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या मालतीमाधव या इमारतीमधील त्यांच्या बंद फ्लॅट मधे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. लक्ष्मीच्या शोधात आलेल्या चोरांना बघेल तिकडे फक्त सरस्वतीचे दर्शन होत होते.त्या मुळे काहीही चोरीला गेलं नाही.रिकाम्या हातानी त्यांना परत जावे लागले.

पु.लं.च्या अंत्य यात्रेचे थेट प्रक्षेपण सह्याद्री दूरदर्शनने केले होते .एखाद्या साहित्यिकाबाबतीत असे बहुदा प्रथमच घडले असेल.

तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पु.ल. (भाई) बद्दल काही लिहायला मिळाले हे तर माझे भाग्यच.

पुलंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०

5 months, 2 weeks ago

महाराष्ट्राचे लाडके भाई

पु.ल.देशपांडे.
निधन : १२ जून,२०००

प्रत्येक मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव म्हणजे पु.ल.देशपांडे. जगभर जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे पु.ल. देखील पोचले आहेतच. अगदी दक्षिण ध्रुवावर असलेल्या दक्षिण गंगोत्री या भारतीय तळावर असलेल्या मराठी माणसांनी सोबत पुलंची पुस्तके नेली आहेत. असे भाग्य अन्य कोणाला लाभले नसावे. त्यांच्या साहित्या व्यतिरिक्त, त्यांचे किस्से ,कोट्या आणि विचार,त्याच बरोबर त्यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या काही गाण्यांबद्दल माहिती त्यांच्या स्मृतीदिनी आठवणींचा जागर करताना देतो आहे.

कोट्या

मामा नावाची गंमत

गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’

भारती मालवणकर

पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.

माणिक वर्मा

माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.नी केलेल्या खुमासदार कोटीमुळे धमाल उडाली .‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल.पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की.

किस्से

गुळाचा गणपती

पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती' त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा,पटकथा,संवाद,गीते, संगीत आणि दिग्दर्शन,एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला.

प्रतिशब्द

मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘एअर होस्टेस ला आपण ‘हवाई सुंदरी’ म्हणतो,तर नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘वाढपी’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी’ का म्हणू नये ?’

संजय उवाच

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला’

माझ्या बंधू आणि भगिनींनो

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.

भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,‘ सभ्य स्त्रीपुरुष हो... मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे.

’त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,‘बंधू आणि भगिनींनो... समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘ बंधू आणि भगिनींनो... ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘ भाई ’ म्हणते ’

द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती

तुमचं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारल्यावर ते म्हणाले . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय, असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो, ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती

हवाई गंधर्व

पंडित भीमसेन जोशी यांचे साऱ्या देशभर आणि परदेशात सारखे दौरे सुरु असायचे. त्या मुळे त्यांच्या वारंवार होणाऱ्या विमानप्रवासांमुळे त्यांना पु. ल. देशपांडे यांनी गमतीने ‘हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती.

पु.लं चे विचार

जगा इतके की आयुष्य कमी पडेल. हसा इतके की आनंद कमी पडेल.

भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.

खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.

काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे देखील हतबल होतात.

मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात

भेटी आणि गाठी

8 months, 1 week ago

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.@suvichar_marathi

8 months, 3 weeks ago

आता झालंय असं की, जगण्यातली विसंगती आम्हाला दिसतच नाही. दिसली, तरी आम्ही ती टिपत नाही. टिपली, तरी ती मांडण्याची खाज आम्हाला सुटत नाही. सुटली, तरी मग त्यातून कोणाच्या तरी भावना दुखावतात. मग कधीकधी आम्ही अॅट्रॉसिटी केली असते, तर कधी देशद्रोह. पुलं, तुम्ही लिहीत होतात तेव्हा तुम्हालाही निषेधाची प्रेमपत्रं येत होती. पण आता प्रेमपत्रांवर भागत नाही. आता घरांवर मोर्चे येतात, लिहिणाऱ्याला सगळेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून परस्पर खटला चालवतात. त्याला दोषी ठरवून यथेच्छ समाचार घेतात. नकोसं होऊन जातं. आपण 'वझ्याचे बैल' बनून जगावं, तेच बरं, असं होतं.
पण मग पुन्हा तुम्हीच आठवता. तुम्हाला ज्या ज्या वेळी जी भूमिका योग्य वाटली, ती तुम्ही ठामपणे मांडलीत. त्याचे परिणाम काय होतील, याचा जराही विचार केला नाहीत. प्रसंगी परिणाम भोगायलाही तयार होतात आणि तसे भोगलेतही. तुमच्या भूमिकांवर टीकाही झाली. तुम्ही नेहमीच बोटचेपी भूमिका घेतलीत, असंही काहींचं म्हणणं आहे. पण उगाच पेटून वगैरे उठणं आणि कोणाच्या तरी कानशीलात भडकावणं, हा तुमचा स्वभावच नव्हता. त्या अर्थी तुम्ही मध्यमवर्गीयच राहिलात. आमच्यासारखे. पण तरीही भूमिका मांडणं तुम्ही सोडलं नाहीत. कधीकधी आयुष्यात खूप नैराश्य येतं. सगळं जग आपलं दुष्मन झालंय, असं वाटतं. मग मी शांतपणे तुमचं एखादं पुस्तक काढतो. पाचव्या मिनिटाला भोवतालाचा विसर पडतो. मी दंग होऊन जातो. पुस्तक खाली ठेवून उठतो, तेव्हा मी बदललेला असतो. जगण्याची, झुंजण्याची नवी ऊर्मी घेऊन तयार असतो.
आज तुमचा वाढदिवस... आम्ही मराठी माणसं खरंच थोर की, आमच्या मातीत तुमच्यासारखा माणूस घडला ज्याने आम्हाला एवढं भरभरून दिलं. हजार हातांनी दिलंत. आमच्या झोळ्या फाटक्या... जेवढं घेऊ शकलो, तेवढं घेतलं. पण घेता घेता देणाऱ्याचे हात मात्र घेता आले नाहीत, हेच शल्य आहे.
- तुमचा,
रोहन टिल्लू.
Rohan Tillu

पूर्वप्रकाशित दि. ०९/११/२०१७

8 months, 3 weeks ago

फक्त मीच नाही, घरातले सगळेच पुलं मय झाले होते. मला आठवतं पुलकित होणे, या वाक्प्रचाराचा अर्थ परीक्षेत विचारला होता आणि मी 'पुलंचं पुस्तक वाचणे' असं लिहीलं होतं. कारण ते वाचताना पुलकित होतच होतो की आम्ही! घरात बाबा, दादा, काका वगैरे गप्पा मारायला बसलो की, तुमच्या लेखनाचा विषय निघाला नाही, असं झालंच नाही.
खिल्ली लिहीताना तुमच्याकडलं विनोदाचं अस्त्र किती काळजीपूर्वक परजलं होतंत तुम्ही. एक शून्य मी वाचूनही ज्यांना तुमच्यातला विचारी माणूस दिसला नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. घरमालकास मानपत्र लिहिलंत, पण आमच्यासारख्या तुमच्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्यांनाही ते मानपत्र मायबाप भारत सरकारलाच लिहिलंय असंच वाटतं. आणि अजूनही वाटतं. हे तुमच्या लिखाणाचं यश म्हणावं की, व्यवस्थेचा पराभव?
तुमचं लेखन... मी त्याबद्दल काय लिहावं. तुमचं एक एक वाक्य असं डौलदार असतं की, काय बोलावं. तुमच्या वाक्यातला एखादा शब्द इकडचा तिकडे केला किंवा तुम्ही लिहिलेल्या शब्दाच्या जागी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला, तरी त्या वाक्याचा डौल बिघडलाच म्हणून समजा. तुम्ही लिहिलेली 'तुझे आहे तुजपाशी', 'ती फुलराणी', 'सुंदर मी होणार' ही नाटकं गद्य असली, तरी त्यातली गेयता काही वेगळीच आहे. ही नाटकं नुसती ऐकतानाही त्यांचा ताल खिळवून ठेवतो.
तुम्हाला माहीत नाही, पण सध्या इथे 'आम्ही बुवा वाचतो' असं सांगणाऱ्यांची एक टोळी तयार झाली आहे. भरीव दिसणारी, तरी प्रचंड हलकी (वजनाने म्हणतोय मी) पुस्तकं घेऊन ती वाचून 'अमक्याच्या लव्हस्टोरीत काय लफडं झालं होतं, तमक्याने गर्लफ्रेंडला कसं पटवलं' यावर चर्चाही झडतात. ते साहित्य असेल कदाचित. पण तुमच्यासारख्यांच्या साहित्यावर पोसलेल्या आमच्या पिंडाला ते कसं काय मानवावं?
'असा मी असामी'मध्ये तुम्ही मध्यमवर्ग कसा कसा बदलत गेला, हे किती समर्पकपणे मांडलं होतंत. बरं ते मांडतोय, असा कोणताही आव आणू न देता. खरं तर माझ्या पिढीने झंझावातासारखे बदल पाहिले. अजूनही पाहतोय. आम्ही चूल पाहिली, गॅस पाहिले, स्टो वर होणारा स्वयंपाक बघितला, सोलार शेगडी बघितली, पाइपलाइन गॅस बघितला आणि आता तर वीजेवर चालणारी शेगडीही बघतोय. घरात फोन नसणं इथपासून ते फोन आल्यानंतर त्याची साग्रसंगीत पूजा करून पहिला फोन लावणं, प्रेमात पडण्याच्या वयात ब्लँक कॉल्स देणं, हक्काचा पीसीओवाला गाठून एक-एक रुपयाची नाणी सरकवत समोरचा 'त्या वेळी' गोड वाटणारा आवाज कानात साठवणं, आपल्या हितगुजांची स्मारकं असलेले ते पीसीओ बुथ बंद होताना बघणं, त्याची जागा मोबाइलने घेणं, त्यातही कॉल लावायला १६ रुपयांपासून ते आता १ पैसा प्रतिमिनिटापर्यंत किती तो बदल...
आम्ही मोठे होत असतानाच नेमकं ते जागतिकीकरण-उदारीकरण आणि खासगीकरण झालं आणि झपाट्याने आसपासचं जग आणि आम्हीही बदललो. आतापर्यंत कधीच न ऐकलेले ब्रँड्स हलक्या पावलांनी भारतात शिरले होते. उच्च मध्यमवर्ग नावाची एक जमात निर्माण होत होती. आधी लोअर मिडलक्लासमध्ये असलेली आमच्यासारखी कुटुंब मिडलक्लासची पायरी चढत होती. नाक्यावरचा वाणी टापटीप झाला होता. इराणी तर केव्हाच बंद पडले होते, पण आता ठिकठिकाणच्या उडप्यांनीही मान टाकायला सुरुवात केली आणि मॅक्डोनाल्ड्ससारखी चेन उभी राहत होती. खरेदी करणं हा सुखद अनुभव बनत चालला होता. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बंद पडून त्या जागी सर्व्हिस इंडस्ट्री फोफावत चालली होती. पूर्वी अगदी मोजक्या घरांपुढे दिसणारी चारचाकी इतकी स्वस्त झाली की, घरटी दोन, तीन गाड्या येऊ लागल्या.
तुम्ही असतात, तर हा बदल कसा टिपला असतात? असा मी असामीची पुढली आवृत्ती आली असती का? बटाट्याची चाळ संपवताना तुम्ही 'एक चिंतन' लिहीलं होतंत. इथे तर एक समाजव्यवस्था मोडकळीला येत होती आणि दुसरी तयार होत होती. आमची वयं कमी होती, पण आमच्या पालकांची अवस्था नक्कीच सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच. मंगेशराव, जनोबा रेगे यांच्यासारखीच झाली असणार. पण भाई, त्यांची दु:खं नेमकी पकडणारा, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या विवंचना मांडणारा तुमच्यासारखा कोणीच आसपास नव्हता. तो असता, तर परिस्थिती बदलली असती, असं बिलकुलच नाही. पण रोजचा गाडा मुकाटपणे ओढणाऱ्या आपलीही दखल कोणीतरी घेतंय, हे बघून जरासं बरं वाटलं असतं.
माझ्या पिढीतल्याच नाही, तर माझ्या नंतरच्या पिढीतल्या अनेकांसाठीही तुम्ही आउटडेटेड झाला नाहीत. तुम्ही तेवढेच रेलेव्हंट राहिलात. तुमच्या लेखनाचा प्रभाव आमच्यापैकी अनेकांवर आहे. आमच्या लिखाणातून कधीकधी अचानक तुम्ही डोकावता. मग आमचं आम्हालाच कौतूक वगैरे वाटतं. आणि लगेचच दुसऱ्याच क्षणी स्वत:च्या खुजेपणाची जाणीवही होते. आम्ही लिहीलेलं वाईट असतं, असं नाही. पण ते तुमच्या आसपासही पोहोचत नाही.

9 months, 2 weeks ago

'चंदकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं, 'नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की 'हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणाऱ्या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील.' त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या 'तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय?' मी मनात म्हणालो 'मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते. म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता. शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो, 'एक आनंदाचं देणं'. पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे... '

चंदकांत बाबुराव राऊत
शनीवार, नोव्हेंबर ११ २००६
महाराष्ट्र टाईम्स

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago